रश्मी बागल भाजपमध्ये आल्या तर त्यांचे स्वागत करू; भाजप नेत्यांकडून खुली ऑफर 

करमाळा – भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) कोणाला घ्यायचे व कोणाला नाही घ्यायचे हा निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी घेत असतात त्याचा आमचा संबंध नसतो. मात्र रश्मी बागल (Rashmi Bagal) भाजपच्या संपर्कात आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून अशा परिस्थितीत बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे स्पष्ट मत भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे (Ganesh Chiwte) आणि शहरप्रमुख जगदीश अगरवाल (Jagdish Agarwal) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी मधील तालुका व शहर कार्यकर्त्यांमध्ये झालेले मतभेद दूर करून आम्ही सर्वजण एकत्रित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न काल भारतीय जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस दीपक चव्हाण,अमर सिंग साळुंके, श्याम सिंधी, अमोल पवार, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव सचिन गायकवाड, शरद कोकीळ आदीसह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी बागल गटाचे नेते मंडळींनी नुकतीच टेंभुर्णी येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis) यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली याबाबत प्रतिक्रिया विचारली असता जगदीश अग्रवाल म्हणाले की भारतीय जनता पार्टीत कोणाला प्रवेश द्यायचा हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ पदाधिकारी घेतात जर रश्मी बागल शिवाय तालुक्यातील जे जे नेतेमंडळी भारतीय जनता पार्टी मध्ये येतील त्यांचे आम्ही स्वागत करू.

यावेळी दीपक चव्हाण (Deepak Chavan) म्हणाले की येणाऱ्या करमाळा तालुक्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी सर्व ताकदीनिशी लढवणार असून वेळ प्रसंगी काही पक्षांना सोबत घेण्याचे सुद्धा आमची तयारी आहे पण जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन अन्यथा स्वबळावर सर्व निवडणुका लढवू असे सरचिटणीस चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की करमाळा नगरपालिक मधील भोंगळ कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे सत्ताधारी कोण विरोधक कोण हे समजत नाही यामुळे सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी स्वबळावर नगरपालिका लढवणार आहे. विद्यमान सर्व पदाधिकारी भ्रष्टाचारी असतील तर या यातील काही जणांची आपण युती करणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वेळप्रसंगी ठरवू असे सांगितले.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप (Shambhu Raje Jagtap) भाजपमध्ये कार्यरत आहेत. तर  दुसर्‍या बाजूने ते जगताप गटाची सत्ता नगरपालिकेत येणार असे सांगतात यावर बोलताना जगदीश अग्रवाल म्हणाले की राजकारणात असे चलते असे सांगत स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले.आजच्या पत्रकार परिषदेत मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपसातले मतभेद मिटवून निवडणुका एकत्रित लढण्याचे संकेत दिले आहेत.