वारकरी सांप्रदायाचे विचार अंमलात आणले तर या जगात लढाया, दंगे, भानगडी होणार नाहीत – भुजबळ 

पुणे :- वारकरी सांप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा सांप्रदाय नाही या सांप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. वारकरी सांप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले. वारकरी सांप्रदायाचे विचार अंमलात आणले तर या जगात लढाया दंगे भानगडीच होणार नाही, जगभरात शांतता नांदेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वारकरी सांप्रदाय समाज तालुका मुळशी या संस्थेचा हिरकमहोत्सव व ज्येष्ठ वारकऱ्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा  मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सुभद्रा लॉन्स मुळशी पुणे येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोकराव मोहोळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आबासाहेब ढमाले, माजी आमदार शरदराव ढमाले, राजाभाऊ ठोंबरे, शांताराम इंगवले, तुकाराम टेमघीरे, मारुती धुमाळ, स्वाती हुळावळे, राजाभाऊ वाघ, नरहरी माझीरे, भगवान नाकती, बापू भुजबळ, प्रितेश गवळी,दत्तात्रेय भेगडे, बाबा कंदारे,हभप चंद्रकांत वांजळे, चंदाताई केदारे, भानुदास पानसरे, बाबाजी शेळके, नंदकुमार वाळंज, महादेव कोंढरे, सुनील चांदेरे, कालिदास गोपालघरे  यांच्यासह वारकरी संप्रदाय समाज मुळशीचे सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.

ते म्हणाले की, ज्ञानेश्वर महाराजांनी मूळ बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार – प्रचार अधिक व्यापक स्वरूपात केला. आपल्या ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ, अभंग, विरहीन्या इत्यादी चिंतनशील रचनांमधून व प्रत्यक्ष आचरणातून त्यांना लोकांच्या मनात विवेकाची ज्योत जागृत केली. पसायदानाच्या रूपाने दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि समतेचा संदेश त्यांनी महाराष्ट्रातील घराघरांत पोचवला. भारतीय परंपरेतील विविध विचारधारा, जाती, वर्ण, पंथ आणि सांप्रदाय एकत्रित आणून "हे विश्वची माझे घर’ हा नवा वैश्विक विचार जगापुढे मांडला. धर्माच्या आणि प्रांतांच्याही सीमा या विचारांनी मोडून काढल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, श्री ज्ञानदेवांचा हा वैश्विक विचार वसुधैव कुटुंबकम् या मूळ भारतीय वेदपरंपरेशी जोडणारा होता. जनसामान्यांच्या मनात हा विचार रुजवण्यासाठी भक्तांची मांदियाळी सोबत घेऊन अवघा मुलूख श्री ज्ञानदेवांनी पालथा घातला. आपल्या सवंगड्यांसह पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेले श्री ज्ञानेश्वर लोकांनी पाहिले, तेव्हा गावोगावचे लोक या दिंडीत सहभागी होऊ लागले. मंदिराच्या बंदिस्त गाभाऱ्यात नव्हे, तर शेताच्या बांधावर बसून द्वैत, अद्वैत सिद्धांत आणि कुट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल, अशा सोप्या मराठी भाषेत सहजपणे समजावून सांगणारा हा गोजिरवाणा बाळ अवघ्या मराठी मुलखाला आपला वाटला आणि मग श्री ज्ञानोबांच्या दिंडीत अवघा समाज लोटला. श्री ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही पंढरपूरची वारी होती. परंतु, श्री ज्ञानदेवांनी आपल्या सवंगड्यांसह काढलेली पायी दिंडी ही परिवर्तनाची नांदी होती. ज्या काळात श्री ज्ञानेश्वरांनी हे विचार रुजवले, तो काळ पाहता त्यांचे कार्य फार अलौकिक असे कार्य होते.यातूनच वारकरी संप्रदायाचा हा वाढीस लागला. पुढे नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंत अनेक संतांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले. महाराष्ट्राच्या या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अभिजात दर्जामुळे वाड्मयाच्या अभ्यासाला सुद्धा मदत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.