“निवडणूक आयोग विकलं गेलंय, हा आयोग तत्काळ बरखास्त करा”, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी

मुंबई- केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देत उद्धव ठाकरे यांना ४४० व्होल्टचा झटका दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला बरखास्त करण्याची मोठी मागणी केली आहे.

“निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे. शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणूका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे”, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दिल्याने या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आता सुप्रीम कोर्ट यावर काय निकाल देते?, हे पाहावे लागणार आहे.