लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी भाजपकडून होतेय. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज सकाळी १० वाजता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचं अधिवेशन एका आठवड्याने वाढवलं पाहिजे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे. अर्थचक्र कोमात गेलं आहे. आज राज्यात अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत. धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे. आरोग्य सेवेचं अपग्रेडेशन झालं नाही. मंत्रालया भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असे अनेक विषय आहेत.

पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यात होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आक्रोश आणि रोष आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील. नाही तर नाही वाढवणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दरम्यान, २ दिवसात विरोधकांनी केलेल्या हल्ल्यापुढे सरकारचा निभाव लागला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कालावधी वाढवून सरकार स्वतः अडचणीत येईल अशी शक्यता असल्याने कालावधी वाढवला जाणार नाही असेच सध्यातरी दिसत आहे.