साने गुरुजी जयंती विशेष : साने गुरुजींची सेवादल शिबिरातील शेवटची मांडणी….

पुणे : मुलांना आणि तरुणांना दुखवण्याचे साने गुरुजींच्या जिवावर येई आणि त्यासाठी खूप दगदग त्यांना सोसावी लागे. सेवादलाच्या कार्यक्रमांना नकार देणे त्यांना अशक्य असे. सेवादलाच्या वार्षिक शिबिरात मुले त्यांची उत्सुकतेने वाट पहात आणि गुरुजीनाही राहवत नसे.

1950 च्या मे महिन्यात सांगलीला भरलेल्या सेवादल शिबिराला ते गेले आणि ये हृदयीचे ते हृदयी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तोच सेवा दलाला त्यांचा जणू अखेरचा संदेश होता!

ते म्हणाले, ‘ज्या देशाला लोकशाही मार्गाने जावयाचे त्याला सद्गुणांची जोपासना करण्यावाचून गत्यंतर नाही. जेथे संयमी, विवेकी, सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक असतील, तेथे व्यक्तिस्वातंत्र्यही वाढू शकेल. व्यवहार भ्रष्ट असेल, सार्वजनिक जीवन जर पै किंमतीचे झाले असेल तर ह्या राष्ट्राला कोणती आशा? आज राष्ट्राला आपण सारे एक, ही शिकवण देणारी संघटना हवी आहे. ही संघटना सेवादल हीच एक आहे. तुम्ही सारे हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर एकत्र या नको स्पृश्य, नको अस्पृश्य एकत्र उठा-बसा, खा-प्या, खेळा-शिका, काम करा. आपण भारतमातेची सारी लेकरे.

“जातिधर्मनिरपेक्ष अशी महान राष्ट्रीय भावना, तिचा प्रचार अधिक धान्याची उत्पत्ती, स्वच्छता, साक्षरताप्रचार, सहकारी शिक्षण अशा निरनिराळ्या आजच्या गरजा आहेत. सेवादलाने हे व्यापक शिक्षण या गरजा भागवणारे शिक्षण स्वतः घेऊन राष्ट्राला द्यायला उभे राहिले पाहिजे. कणभर निर्मळ सेवादेखील तारणारी आहे. वाटेतील केळ्याचे एक साल जरी जाताना उचलले तरीही सेवा झाली कणभर सेवा की मणभर सेवा हा महत्त्वाचा प्रश्न नाही, ती दृष्टी, तो ध्यास आहे की नाही, हा प्रश्न आहे. जोवर सेवादलाजवळ सेवेचा प्राण आहे तोवर सेवादल अमर आहे. सेवादलाने प्रत्यक्ष सेवा रोज काहीतरी करायला हवी. स्वच्छता करा, सफाई करा. साक्षरतेचे वर्ग रात्री चालवा गावातील घाण एके ठिकाणी नेऊन खत बनवा. एखादे पड़ित वावर घेऊन तेथे शेती करा. मळा करा. भाज्या करा. काहीतरी उद्योग यायला हवा. बुरुड काम, बुक बायंडिंग काहीतरी येवो. आज देशाला आपल्या हातांनी काहीतरी उपयोगी वस्तू निर्माण करणारे लोक हवे आहेत. रिकाम्या हातांचा मनुष्य मृतवत होय.

“सहकारी संस्था चालवताहेत, सहकारी शेती करताहेत, स्टोअर्स चालवताहेत, परिश्रमालये चालवताहेत, नाना वस्तू तयार करताहेत. आळस ज्यांनी झुगारला आहे. क्षुद्र भेद ज्यांना ठाऊक नाहीत, जातिभेद, धर्मभेद, प्रांतभेद यांच्या पलीकडे जाऊन अंतरात्म्याला पाहाण्याची ज्यांची दृष्टी असे शेकडो सेवादल सैनिक, हे नवव्रती नव तरुण जर भारताला मिळतील तर आलेले स्वराज्य आज ना उद्या पुरुषार्थप्रद करता येईल.”

नवविचारांचा असा शिडकावा करत त्यांचा हरेक दिवस जात होता. अखेर जवळ आल्याच्या जाणिवेने का ते आपल्या जवळचे सारे विचारधन वाटत सुटले होते? बहुधा तसेच असावे!

संदर्भ :
साने गुरुजी : राष्ट्रीय चरित्रमाला
दहावी आवृत्ती 2013
लेखक : यदुनाथ थत्ते, 1985
प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इडिया1950