ओबीसी आरक्षणाबाबतची सुप्रीम कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी 

मुंबई  – ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील  कालची सुनावणी  आज होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश मधील देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका याचिकेवर संयुक्तपणे दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने या संदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारची भूमिका यात अगदी सुस्पष्ट असून ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले आहे.दरम्यान ओबीसी अरक्षणासंदर्भात मा. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या केससाठी माजी खासदार समीर भुजबळ हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. रोज याबाबत ते अनेक जेष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेऊन चर्चा करत आहेत.