‘नाना पटोलेंच्या तोंडी पिकविम्याची भाषा हा तर एक राजकीय विनोद’

अंबाजोगाई (वार्ताहर) –2019 साली राज्यात महाविकास अघाडी सत्तेवर आले तिथंपासून शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा अडीच वर्षे का मिळाला नाही.?, माञ आता पुन्हा शिंदे-फडणविसांच्या काळात पीक विमा मिळणारी प्रक्रिया सुरू झाली असून विमा प्रश्नावर कॉंग्रेस पक्ष पिक विमा मदत कक्ष उघडणार प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोलेंची ही घोषणा म्हणजे एक मोठा राजकीय विनोद असल्याची घणाघाती टिका भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी (BJP spokesperson Ram Kulkarni) यांनी केली.

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भाजपा प्रवक्ते कुलकर्णी यांनी म्हटले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांनी शेगावात पत्रकार परिषद घेवून विमा मदत कक्ष उघडणार अशी घोषणा करीत केंद्र आणि राज्य सरकारवर टिका केली. त्याला उत्तर देताना कुलकर्णी  म्हणाले की, ठाकरे सरकार सत्तेवर असतांना शेतकऱ्यांना का मदत केली नाही ? त्यांच्या काळात प्रचंड अतिवृष्टी झाली. मागच्या वर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला तेव्हा देखिल ठाकरे सरकार मदतीला आले नाही. कुठले अनुदान नाही, जनावरे वाहून गेली, घरे वाहून गेली, जमीनी खरडून गेल्या तेव्हा साधी दमडी मदत ही केली नाही. महाराष्ट्रात चक्रीवादळ, ओला दुष्काळ असताना ही पण, ठाकरे सरकार त्यावेळेस मदतीला धावून आले नाही. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने त्याच काळात एक रूपयाचा ही विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला नाही. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली पण, विमा वाटप का केला नाही ? हा सवाल पटोले यांना कुलकर्णी यांनी केला.

याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मिळणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान महाविकास आघाडी सरकारने बंद करून टाकले. एवढेच नाही तर फडणवीस सरकार असताना राज्यात पाच वर्षांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विमा मिळून दिला. मात्र तो विमा ठाकरे सरकारच्या काळात मिळाला नाही याला जबाबदार कोण ? हा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन सत्ता भोगली होती. आ.नाना पटोले आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतात तो एक विनोद असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्यांना पोहोचत नसल्याचे  कुलकर्णी म्हणाले.  शेगावात पत्रकार परिषद घेऊन आ.पटोले यांनी शेतकऱ्यांविषयी पुळक्याची भाषा करणे म्हणजे मोठा राजकीय विनोदच म्हणावा लागेल. अगोदर आपण अडीच वर्षे सत्तेवर होतात, मग आपण शेतकऱ्यांसाठी नेमके काय चांगले केलेय ? हा हिशोब त्यांनी आधी द्यावा असे आव्हान ही राम कुलकर्णी यांनी पटोले यांना दिले आहे.