हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू ?

मुंबई : महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असणारा कॉंग्रेस पक्ष लवकरच मोठी आणि निर्णायक अशी पावले उचलण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गोटात सध्या विविध घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनानंतर पुढच्या काही दिवसांत मंत्र्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केलंय त्यांनाच मंत्रिपदी ठेवलं जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत.

त्यानंतर राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार त्या मंत्र्यांच्या कामकाजांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं देखील वृत्त आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नसेल त्या मंत्र्याला डच्चू देवून पक्षाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतील अश्या नेत्यांकडे मंत्रीपद दिले जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरुण नेतृत्वाला देखील संधी दिली जाईल अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.