”गंगाने बुलाया है’ असे मोदी बोलले होते परंतु अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही’

मुंबई –  ‘गंगाने बुलाया है’ असे साडेसात वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते परंतु अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे गेले होते त्यावर पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे ते निवडणूकीचे क्षेत्र आहे. प्रश्न असा आहे की, साडेसात वर्षे झाली आहेत. काशीच्याबाबतीत देखील आश्वासन देण्यात आले होते मात्र त्याठिकाणी देखील काहीच झाले नाही. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरते यावरही नवाब मलिक यांनी बोट ठेवले.

आगामी निवडणुकीत कमीत कमी चार ठिकाणी पराभव पत्करावा लागणार आहे. ज्याठिकाणी ते निवडणूक लढतात तिथे आणि आजूबाजूच्या ४ जागाही निवडुन येणार नाहीत असेही नवाब मलिक म्हणाले.

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. मला न्यायालयाचा आदेश प्राप्त झालेला नाही. ज्यावेळी कोर्टाचे आदेश मिळतील. त्यावेळी आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडू असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नवाब मलिक यांनी बोलताना माहिती दिली.

देशाचे पंतप्रधान कोण होतील हा विषय चर्चेला नाही. सामूहिक नेतृत्वाखाली एकजूट होण्याची तयारी सुरू आहे. काही लोकं म्हणतात की टीएमसी तुमचा आमदार फोडत आहेत. जे आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत. ते पाच वर्षापूर्वी आमच्या पक्षात आले होते की, त्यांची मागणी होती की, त्यांच्यासह त्यांच्या मुलीला देखील तिकीट मिळायला हवी. परंतु गोव्यात आमची काँग्रेससोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले असावे की, त्यांना दोन तिकीट मिळणार नाहीत असेही नवाब मलिक म्हणाले.

प्रशांत किशोर हे रणनीतीकार आहेत. ते जे ठरवतील तेच होईल असे नाही. देशात २०१४ मध्ये युपीएच्या विरोधात जसे वातावरण तयार करण्यात आले होते तसाच प्रयत्न सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील ‘त्या’ शब्दाचा प्रयोग केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा भाजप कधी दाखल करणार हा प्रश्न आहे. ज्या पत्रकाराला त्यांनी जो शब्द वापरला आहे त्याने याविरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी यावेळी केले.