सोलापुरात ठाकरेंच्या युवा सेनेला भगदाड; शिंदे गटात इनकमिंग सुरूच 

करमाळा (प्रतिनिधी ) – तीनच महिन्यापूर्वी दैनिक सामना मधून प्रसिद्धीपत्रकाद्वारे नियुक्ती झालेल्या ठाकरेंच्या युवा सेनेच्या तालुकाप्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड सह दोनशे युवा सैनिकांनी ठाकरे सेनेला रामराम करून शिंदे सेनेचा झेंडा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली खांद्यावर घेतला आहे.

ठाकरे युवा सेनेचे राजीनामा दिल्यानंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख म्हणून वैभव मावलकर (झरे) तालुकाप्रमुख म्हणून राहुल कानगुडे तर शहर प्रमुख म्हणून विशाल गायकवाड यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा युवा सेनेचे राज्याचे सचिव किरण साळी यांनी केली आहे. या नियुक्तीचे पत्रे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.

राहुल कानगुडे, विशाल गायकवाड यांनी तालुक्यात जवळपास 22 ठाकरेंच्या युवा सेनेच्या शाखा उघडून मजबूत संघटन उभा केले होते मात्र आता त्यांनी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कानगुडे व गायकवाड सोबत 22 युवा सेनेच्या शाखेत प्रमुखांनी राजीनामा दिला असून जवळपास 200 ठाकरे च्या युवा सैनिकांनी शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. ठाकरेंच्या युवा सेनेची करमाळा महाविद्यालयीन कार्यकारणी सुद्धा बरखास्त झाली असून आता नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकारणी तयार करणार असल्याची माहिती  प्रमुख विशाल गायकवाड यांनी दिली.