आपला तो बबल्या, दुसर्‍याचं ते कार्ट, सुप्रिया ताई असं राजकारण बरं नव्हे !

राम कुलकर्णी –  वर्तमान राजकीय व्यवस्थेत नवीन फॅड आलं असून राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार्‍या महिला यांना देखील सत्य-असत्य राजकिय घडामोडीचा वेध घेता येईना. त्याहुन अधिक आपल्या पक्षात घडणार्‍या घटना पवित्र त्यावेळी लोकशाही धोक्यात नाही? कायद्याचा वापर आणि राजकिय दबाव व्यवस्थित वाटणे म्हणजेच आपला तो बबल्या, दुसर्‍याचं ते कार्ट असं आता राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या एकुण भुमिका पाहिल्यानंतर म्हणावे लागेल. माजी मंत्री जितेंद्र  आव्हाडांवर  भाजपाच्या रिदा रशिद यांनी ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. अर्थात जामिन मिळाला हा भाग वेगळा पण त्यात आवाडांनी घातलेला गोंधळ रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते, केलेले आंदोलन हे कोणत्या लोकशाहीत बसतं? महिलांचे नेतृत्व आम्ही करतो असं भासवणार्‍या सुप्रियाताईंना केतकी चितळे प्रकरण किंवा नवनीत राणा प्रकरणात महिलांना पोलीसांनी दिलेली वागणुक एवढेच नाही तर त्यांनी काढलेली परेशानी हे का दिसलं नाही? रिदा रशिद यांच्या दोन्ही खांद्याला हात लावुन ढकलणार्‍या आवाडांनी इतर विशेषत: पुरूषाच्या अंगाला हात लावला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित रहातात. आवाडांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या सुप्रियाताई असो किंवा विद्या चव्हाण यांना याच आवाडांनी मागच्या आठवड्यात सिनेमागृहात घुसुन केलेली मारहाण खांद्याला उचलुन ढकलून दिल्याचे देशांनी पाहिलं. कायदा हातात घेवुन गुंडागर्दी करणार्‍या लोकप्रतिनिधीची दुसरी बाजु सुप्रियाताईंना दिसली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

जितेंद्र आवाड आणि त्यांचं राजकारण सार्‍या महाराष्ट्राला माहित आहे. पुरोगामी विचाराचा डांगोरा पेटवत भाजपाला शिव्या घालणे एवढेच काम त्यांनी आयुष्यभर केलं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वत: कायदा हातात घेवुन जणु काही आपणच आजन्म गृहमंत्री आहोत हे वर्तन लोकांच्या समोर अनेकदा आलं. मंत्री असताना रक्षणासाठी असलेल्या पोलिसांना हाताशी धरून त्यांनी शासकिय बंगल्यावर करमुसे नावाच्या एका गृहस्थाला केलेली मारहाण कोणत्या परिभाषेत बसते? किंवा आज जे ओरडतात त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियावर आलेल्या मारहाणीच्या कॅसेट पुन्हा पाहण्याची गरज आहे.

राजकारणात आपले कुणी चुकत असेल त्याचा कान पकडून त्याला जागेवर आणणं नेतृत्वाचं काम असतं. अनेक घटना आवाडांच्या सांगता येतील. पण सरलेल्या पंधरवाड्यात दोन घटना त्यांनीच गाजवल्या. ठाण्यात एका सिनेमागृहात घुसुन त्यांनी प्रेक्षकांना केलेली मारहाण लोकांनी पाहिली. खरं तर राजकारण्याचा कधी कधी किळस येतो. कायदा हातात लोकप्रतिनिधी घेतातच कसे? सिनेमा बंद पाडायचा होता तर लोकशाहीचे मार्ग अनेक आहेत. प्रेक्षकांना स्वत: आवाडांनी मारहाण करून कायदा हातात घेतला. त्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर झालेली आरडाओरड जणुकाही आवाडांच्यासाठी कायदा शुन्य याचं प्रशस्तीपत्रक देण्यासारखी म्हणावी लागेल.

ठाण्यातल्या कार्यक्रमात जिथे मुख्यमंत्री, इतर मंत्री एका पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. रिदा रशिद त्याच भागातलं महिला नेतृत्व असल्याने त्यांची उपस्थिती साहजिकच. एव्हाना जितेंद्र आवाड लोकप्रतिनिधी असल्याने ते पण आले. गंमत बघा काही राजकिय पुढार्‍यांना विरोधक डोळ्यात कसे सलतात? असा अर्थ त्या घटनेतून निघु शकतो. गाडीच्या समोर रिदा रशिद येताच जणुकाही यांच्या डोळ्यातले रक्त खाली पडलं या आवेशात त्यांनी दोन्ही खांद्याला पकडून त्यांना ढकलून दिलं. प्रश्न या ठिकाणी एक महिला तिचा झालेला अपमान गर्दीत जाणिवपुर्वक ढकलण्याचा प्रयत्न ही संस्कृती राष्ट्रवादीची राजकिय निश्चित म्हणावी लागेल. इलेक्ट्रॉनिक मिडिया सतत कॅसेट दाखवत होते. त्याचं बारकाईने निरीक्षण केले तर आव्हाडांच्या समोर एक पोलीस अधिकारी आले, दोन कार्यकर्ते आले त्यांना एकही शब्द उच्चारला नाही. मग पुरूषाला सोडता आणि महिलेला गर्दीत ढकलता नेमका उद्देश काय?

विनयभंग तक्रारी वरून तपासाचा भाग असला तरी घटना गंभीरच म्हणावी लागेल. राजकिय संस्कृती अंगात असेल तर हात जोडून सदर महिलेला ताई, भगिनी म्हणत थोडं बाजुला व्हा अशी विनंती केली असती पण या अपेक्षा राष्ट्रवादीच्या मंडळीकडून कराव्या तरी कशा? खरं तर सुप्रियाताई सुळे, विद्याताई चव्हाण यांनी मोठ्या आवेशाने घटनेनंतर प्रतिक्रिया दिल्या. पण ज्या महिला नेतृत्वांना दुसर्‍या महिला नेतृत्वाचा झालेला अपमान कसा देखावला? हा प्रश्न पडतो.

जितेंद्र आवाडावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जामिन देखील मिळाला. वास्तविक पहाता महिलांची तक्रार आल्याबरोबर नोंद करून घ्या अशा सुचना न्यायव्यवस्थेने सुद्धा पोलीसांना दिल्या आहेत. इथे राजकिय दबावाचं कदाचित प्रश्न येणार नाही. पण राष्ट्रवादी मंडळीच्या नेत्यांनी आवाड प्रकरणात घेतलेली भुमिका आपला तो बबल्या, दुसर्‍याचं ते कार्ट या उक्तीप्रमाणे होय.एखाद्या घटनेत कुणाची चुक किंवा कुणी राजकिय वापर केला याचं मुल्यांकन जनता पहात असते. सुप्रियाताईंना आमचा देखील सवाल असा आहे, केतकी चितळे प्रकरणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंगावर शाई फेकणे असेल, शिव्या घालणे असेल, सोशल मिडियावर तिच्या विरोधात राळ उठवणे असेल, संसदेत सुप्रियाताईसोबत बसणार्‍या नवनीत राणांना पोलीसांनी अटक काळात दिलेली वागणुक असेल तिथे महिलांचा अपमान राष्ट्रवादीच्या महिला नेतृत्वाला कसा दिसला नाही? एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करायची तर दुसरीकडे सोयीचे राजकारण हे फक्त राष्ट्रवादीच्या पुढार्‍यांनाच जमतं. अहो, केतकी चितळे यांना कोर्टानं दिलासा दिला तर लगेच दुसर्‍या ठाण्याचे पोलीस घेवुन जायला तयार असायचे. खा.नवनीत राणांना  जेलमध्ये जेवण दिलं नाही, झोपायला सतरंजी देखील नाही. मग त्यावेळी राज्यात सत्तेवर कोण होतं? मुख्यमंत्री कोण? 100 कोटीच्या आरोपात एक गृहमंत्री जेलमध्ये गेल्यानंतर दुसरे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असताना त्यांच्याकडून मग पोलिसांवर आलेला राजकीय दबाव हे कशाचं प्रतिक म्हणावे लागेल? जे आवाड आज पोलीस आम्हाला राजकिय दबाव असल्याची भाषा बोलतात मग त्यांच्या काळात या सार्‍या घटनेत पोलीस यंत्रणेवर दबाव कुणाचा होता?  नारायण राणे केंद्रात कॅबीनेट मंत्री असताना महाराष्ट्र पोलीसांकडून त्यांची अटक होते. या सार्‍या घटना अगोदर राष्ट्रवादीच्या मंडळींनी आत्मपरीक्षण करायला हव्यात.

अचानक सत्तेच्या खुर्च्या गेल्या. अशा वेळी मानसिक संतुलन ढासळणं साहजिकच म्हणावे लागेल. तो राजकिय नाविलाज आहे. पण सत्तेचा वापर कसा आणि कुणासाठी करायला हवा? हे सुप्रियाताईच्या तोंडून ऐकणं म्हणजे सत्य कसं असत्य पटवुन द्यावं हे शिकण्यासारखंच होय. लोकशाही अडचणीत आली, दडपशाही सुरू आहे, केंद्रात इडीचा वापर केला जातो, अनेक बिरूदलावर राज्यात राष्ट्रवादी असेल, शिवसेना तथा काँग्रेसवाले घसा कोरडा करत ओरडत असले तरी आपलं काय चुकलं? याचा कधी अभ्यास डोळे उघडून करायला हवा. कधी कधी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर उघडा डोळे, बघा नीट ही बिरूदी आता राष्ट्रवादी नेत्यांच्या कपाळी लिहून ठेवायला हवी. या घटनेत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आवाडांनी आमदारकीच्या राजीनाम्याची भाषा केली ते साहजिकच म्हणावे लागेल. कारण आरडाओरडा करायचा, लोकांची सहानुभुती मिळवायची आणि आपली राजकिय शिदोरी भाजुन घ्यायची ही सवय काही लोकप्रतिनिधींना अवगत असते. जाता जाता सुप्रियाताईंना एवढंच सांगणं, ताई, जरा आत्मपरीक्षण करा, भाजपाची महिला असो किंवा इतर पक्षाच्या महिला असो, किंवा समाजातल्या महिला असो तुमच्यासाठी सर्व महिला आणि त्यांचा सन्मान सारखा का नसावा? याची चिंता वाटते.