वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून वीज खंडित करण्याबाबतच्या बनावट संदेशांमध्ये वाढ

पुणे : वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’द्वारे बनावट संदेश पाठवण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नये. तसेच वैयक्तिक क्रमांकावरून रक्कम भरण्यासाठी पाठविण्यात आलेली कोणतीही ऑनलाइन लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजबिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे.(Increase in fake messages about power cut from personal mobile numbers)

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’द्वारे बनावट संदेश व थेट कॉल येण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. कल्याणीनगर, धानोरी, विश्रांतवाडी, नगररोड आदी भागात अनेक नागरिकांना बनावट संदेश प्राप्त झाले आहेत. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असा बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. मोबाईल कॉल देखील करण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे ज्यांचा वीजबिलांशी काहीही संबंध नाही अशा नागरिकांना किंवा वीजबिल पूर्वीच भरलेले आहे अशा वीजग्राहकांना देखील हा बनावट संदेश पाठविण्यात येत आहे. सावधगिरी न बाळगता नागरिकांनी या बनावट संदेशांना किंवा कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर फक्त ‘ऑनलाइन’द्वारेच वीजबिल भरण्यास सांगणे, त्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटची लिंक पाठविणे किंवा सॉफ्टवेअर (जे मोबाईल किंवा संगणक हॅक करतात) डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. नागरिकांनी या बनावट संदेशांना प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून संबंधित बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येत आहे.

महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व ‘व्हॉटस् ॲप’ मेसेज पाठविण्यात येत नाही. तर ज्या ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे केवळ त्याच वीजग्राहकांना संगणकीय प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. या संदेशाचे सेंडर आयडी (Sender ID) हे VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. तसेच या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी शेअर करण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सोबतच वैयक्तिक क्रमांकावरून ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविले जात नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून अधिकृत सेंडर आयडीद्वारे फक्त ‘एसएमएस’ पाठविले जातात. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’ संदेश तसेच मोबाईल कॉल बनावट आहेत. त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. बनावट संदेशामध्ये नमूद केलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.