मुस्लीम असल्याने उर्फी जावेदवर टीका होत आहे का? उर्फी के सन्मान मे अब तृप्ती देसाई भी मैदान में

मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या पेहरावावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या उर्फीला थोबडवून काढण्याची भाषा चित्रा वाघ यांनी केली. यावरुन सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना जात, धर्मावरुन उर्फीला लक्ष्य केले जात आहे का? असा रोकडा सवाल केला. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनीही उर्फीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर नंगानाच करणाऱ्या उर्फीवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यांनी तिच्याविरोधात मुंबई पोलिस आयुक्तांजवळ तक्रारही नोंदवली आहे. उर्फीच्या कपड्यांवरून निर्माण झालेल्या या गदारोळावर तृप्ती देसाई बोलल्या आहेत.

त्या म्हणाल्या, उर्फी जावेदने घातलेल्या कपड्यांवरून सध्या गदारोळ झालेला पाहायला मिळतोय. परंतु उर्फी जावेद असो, कंगना राणावत असो, दीपिका पादुकोन असो आणि अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अशाप्रकारचे कपडे घालतात. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु आतापर्यंत कुणी अशाप्रकारची कपडे घातले म्हणून कुठलाही अत्याचार झालेला नाही. कारण आता आपण जर पाहिलं तर, अंगभरुन कपडे घातलेल्या महिलेवरही बलात्कार होतो, साडी घातलेल्या महिलेवरही बलात्कार होतो.

परंतु मला असं वाटतं की, आपण संकुचित विचार घेऊन ज्या अभिनेत्री असे कपडे घालतात, त्यांच्यावर काहीतरी टीका करायची. चित्राताईंनी उर्फीचं थोबाड रंगवायची भाषा केली. पण खरं तर महिलांसाठी काम करताना एखाद्या महिलेचे थोबाड रंगवण्याची भाषा तर मुळीच करून नये, असा खोचक टोलाही तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

पुढे उर्फीवर निशाणा साधण्यामागचे कारण ती मुस्लीम आहे, हे तर नव्हे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मला तर असं वाटतं की, उर्फी जावेद हे तिचं नाव आहे, ती मुस्लीम आहे, म्हणून तिच्याविरोधात आवाज उठवला जातोय का? असे असले तर हे अजिबात बरोबर नाही. आवाज उठवायचाच असेल तर असे कपडे घालणाऱ्या सर्व अभिनेत्रींविरुद्ध आवाज उठवा. नाहीतर सरळ सरळ तोंड बंद करा, असा तिखट सल्ला तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

शिवाय उर्फीला पाठींबा दर्शवताना तृप्ती देसाईंनी चित्रा वाघ यांच्यावर खरपूस शब्दांत टीकाही केली. उर्फी समोर आल्यास तिचे थोबाड रंगवल्यास तिला हात लावून दाखवा, आम्ही तिच्या पाठीशी असो. प्रत्येकाची वेशभूषा करण्याची एक पद्धत असते. आदिवासी भागातील स्त्रिया तर ब्लाउज न घालताच साडी परिधान करतात, मग त्याला आपण नंगट म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांच्या कपड्याकडे लक्ष द्यायचं का आपले विचार उच्च ठेवायचे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विरोध करायचा असल्यास सर्वांनाच करा, अन्यथा अशी संकुचित विचारबुद्धी तातडीने थांबवा, असा हल्लाबोलही तृप्ती देसाईंनी केला आहे.