सलग दुसऱ्यांदा भारताने खाल्ली माती, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासह गमावला कसोटी चँपियनशीपचा ताज

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात (IND vs AUS) संघात केंनिग्टन ओव्हल येथे आयसीसी जागतिक कसोटी चँपियनशीप २०२३ चा (WTC 2023) अंतिम सामना रविवारी (११ जून) संपला. ऑस्ट्रेलियाने संघाने तब्बल २०९ धावांच्या फरकाने अंतिम सामना जिंकत कसोटी चँपियनशीपच्या विजेतेपदाचा मान मिळवला. हा कसोटी चँपियनशीपचा दुसरा हंगाम होता. दुसरीकडे भारतीय संघाला सलग दुसऱ्या हंगामात उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा करत आपली बाजू मजबूत केली होती. या डावात ट्रॅव्हिस हेड (१६३ धावा) आणि स्टिव्ह स्मिथ (१२१ धावा) यांनी शतकी खेळी केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी मात्र निराशा केली. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांना वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला मोठ्या धावा करता आल्या नाहीत. रहाणेने १२९ चेंडूत ८९ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या साथीला ठाकूरनेही १०९ चेंडूत ५१ धावांची चिवट खेळी केली. मात्र भारतीय संघ २९६ धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २७० धावांवर आपला डाव घोषीत केला. परिणामी भारताला विजयासाठी ४४३ धावांचे आव्हान मिळाले. मात्र कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारताचा संघ २३४ धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी सामना जिंकत ट्रॉफीही पटकावली.

दुर्देव असे की, भारतीय संघ कसोटी चँपियनशीपच्या पहिल्या हंगामातही अंतिम सामन्यापर्यंत गेला होता, जिथे त्यांना न्यूझीलंडने पराभूत केले होते.