‘या’ खेळाडूच्या जागी पृथ्वी शॉला संधी? दुसऱ्या टी२० सामन्यात अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

IND vs NZ : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (29 जानेवारी) लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताचा न्यूझीलंडने 12 धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय वेळेनुसार हा T20 सामना संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाईल.

दुसऱ्या टी-20 सामन्यातही चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11वर असतील. प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉला संधी मिळते की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असं असलं तरी सलामीवीर इशान किशन काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. ईशान किशनने गेल्या वर्षी 14 जून रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शेवटचे अर्धशतक झळकावले होते, त्यानंतर तो सतत फ्लॉप होत आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

फलंदाज दीपक हुडाचाही फॉर्म चांगला नसून त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा समावेश केला जाऊ शकतो. जितेश शर्माने आयपीएल दरम्यान पंजाब किंग्ससाठी काही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत आणि तो त्याच्या झटपट फटकेबाजीसाठी देखील ओळखला जातो. सलामीवीर शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंग खूपच महागडा ठरला आणि त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये पन्नासहून अधिक धावा दिल्या.

असे असूनही, हार्दिक पांड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात या युवा वेगवान गोलंदाजावर विश्वास ठेवू शकतो. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी रांची T20 मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दोघांनी एकूण तीन विकेट घेतल्या. यामुळे लेगस्पिनर युजवेंद्र चहलला पुन्हा एकदा इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. दुसरीकडे, किवी संघालाही दुसरा सामना जिंकून भारतीय भूमीवर मालिका जिंकायची आहे.

भारताचे संभाव्य प्लेइंग-11: शुभमन गिल, पृथ्वी शॉ/इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, शिवम मावी, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंडचे संभाव्य प्लेइंग-11: डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), फिन ऍलन, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी.