जेव्हा सत्य सांगेन, तेव्हा चकित व्हाल- सत्यजित तांबे  

नाशिक – दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडी चांगलाच जोर लावताना दिसत आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet Tambe) यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील (shubhangi patil )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना देखील दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे. याशिवाय स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार (suresh pawar) यांनीही नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे ही लढत दुरंगी नव्हे तर तिरंगी झाली असून भाजपच्या भूमिकेवर सर्वांचेच भवितव्य अवलंबून असणार आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गोंधळ झाला आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे अपक्ष रिंगणात उतरले. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईसाठी पावलंही उचलली गेली. काँग्रेसचा अंतर्गत गोंधळ नेमका का झाला, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, “नाना पटोले जे सांगत आहेत त्याविषयी आम्ही लवकर सविस्तरपणे राजकीय भूमिका मांडू. नाना पटोले जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. जेव्हा मी सत्य मांडेन तेव्हा सगळेच चकित होऊन जातील.”

“मी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. गेल्या 22 वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आलो आहे. आमच्या परिवाराला 2030 साली काँग्रेस पक्षात 100 वर्षे पूर्ण होतील. आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. मात्र, एबी फॉर्म न मिळाल्यामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.