जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, चौथ्या टी२०त भारताने वेस्ट इंडिजला चारली धूळ; मालिका बरोबरीत

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघात फ्लोरिडाच्या मैदानावर झालेला चौथा टी२० सामना अतिशय चित्तथरारक राहिला. या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत आपला दबदबा कायम ठेवत यजमानांची गोची केली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी १७८ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात युवा सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी शानदार भागीदारी रचत भारतीय संघाला ९ विकेट्स राखून सोपा विजय मिळवून दिला. या विजयासह ५ सामन्यांची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत आली आहे.

वेस्ट इंडिजच्या १७९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) कौतुकास्पद प्रदर्शन केले. ५१ चेंडूत नाबाद ८४ धावा करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ११ चौकार आणि ३ षटकार निघाले. जयस्वालला साथ देत शुबमन गिलनेही ४७ चेंडूत ७७ धावांनी मॅच विनिंग खेळी केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी झाली. परिणामी भारतीय संघाने १७ षटकात सामना खिशात घातला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून शाय होप (४५ धावा) आणि शिमरॉन हेटमायर (६१ धावा) यांनाच मोठ्या खेळी करण्यात यश आले. इतर फलंदाजांना विशेष योगदान देता आले नाही. या डावात भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.