सत्यजीत तांबे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार 

मुंबई – ‘सिटीझनविल’ या कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद  सत्यजीत तांबे यांनी केला असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील नरीमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये, बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते  अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रेरणादायी विचार जगाला देणारे  गौरगोपाल दास, क्रिकेटपटू  अजिंक्य रहाणे आणि राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिष चौहान हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती पुण्यातील अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी दिली आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त बोलत असताना सत्यजीत तांबे म्हणाले की, आपल्याला खरोखरंच महासत्ता बनायचं असेल तर आपण सतत जगभरच्या उत्तम पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी झटलंच पाहिजे, अशी माझी धारणा आहे. तांबे यांनी म्हटलंय की "कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी आपल्या ‘सिटीझनवील : हाऊ टू टेक द टाऊन स्क्वेअर डिजिटल अँड रिइन्व्हेंट गव्हर्नमेंट’ या लक्षवेधी पुस्तकात केवळ ‘सुशासनातील सार्वजनिक सहभाग? या विषयावरचे आपले आगळेवेगळे दृष्टिकोन आणि सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर म्हणून आलेले आपले फक्त अनुभवच मांडलेले नाहीत; तर अमेरिकेतील विविध स्थानिक सरकारे आणि नागरिक यांनी परस्पर लाभदायक संबंध कशाप्रकारे विकसित केले आहेत याची अनेक उदाहरणंही दिली आहेत. हे बदललेले संबंध नागरिकशास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या लोकशाही शासनापेक्षा फारच वेगळ्या प्रकारच्या लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करतात.

सत्यजीत तांबे पुढे म्हणतात की, “जगातील आघाडीची महासत्ता असलेल्या अमेरिकेतील सर्वाधिक संपन्न राज्य अशा कॅलिफोर्नियातील राजकारणी व्यक्तीनं दिलेली उदाहरणं आपल्या देशात कशी काय सुसंगत ठरू शकतील, याचं काही वाचकांना कदाचित आश्चर्य वाटू शकेल. परंतु सुरुवातीलाच मी हे स्पष्ट करतो की, लेफ्टनंट गव्हर्नर न्यूसम यांच्या कल्पना हे भौगोलिक अडथळे सहजगत्या ओलांडतात आणि त्यांच्या कल्पनांमध्ये सर्वांच्याच मनाला भिडण्याची; कळकळीनं आवाहन करण्याची ताकदही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान हे सर्वांना सम पातळीवर आणण्याचं एक महान साधन असू शकतं आणि या पुस्तकातील उदाहरणांपैकी अनेक उदाहरणं थोडेफार परिस्थिती सापेक्ष बदल केल्यावर आपल्या समाजातही कदाचित प्रत्यक्ष काम करू शकतील, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला खरोखरंच महासत्ता बनायचं असेल तर आपण सतत जगभरच्या उत्तम पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी झटलंच पाहिजे, अशी माझी धारणा आहे.”

‘सिटीझनविल’ पुस्तकाचे लेखक गॅविन न्यूसम हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर आहेत. सॅनफ्रान्सिस्कोचे महापौर असताना गॅविन न्यूसम यांनी या शहराच्या विकासासाठी राबवलेल्या उपक्रमांवर हे पुस्तक लिहिलेले आहे. शहर विकासासाठीच्या तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या अत्यंत महत्वपूर्ण विषयावरील पुस्तकाचा काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अनुवाद केला आहे. पुण्यातील अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर आणि सत्यजीत तांबे मित्र परिवार हे या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.