दबक्या पावलांनी आला, यशस्वी जयस्वाल धमाका करुन गेला…! कसोटी पदार्पणात ठोकले धडाकेबाज शतक

IND vs WI : डोमिनिका मैदानावर सुरू असलेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला कसोटी सामना पाहुण्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. प्रथम फलंदाजी करत यजमान वेस्ट इंडिजने ६४.३ षटकात केवळ १५० धावाच केल्या. मात्र प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा वर्षाव झाला. युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने तर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक ठोकत विक्रमांची रास घातली आहे.

२१ वर्षीय युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने पदार्पणातच शतक ठोकून इतिहास रचला. दुसऱ्या दिवसाखेर ३५० चेंडूत जयस्वाल १४३ धावांवर नाबाद आहे. खरे तर फार कमी भारतीय खेळाडूंनी भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. आता त्या यादीत यशस्वी जयस्वालचेही नाव जोडले गेले आहे. जयस्वालच्या आधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, अब्बास अली बेग, प्रवीण अमरे आणि सुरिंदर अमरनाथ यांनी ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जयस्वाल आता सातवा खेळाडू ठरला आहे.