रोहित अन् जयस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, द्विशतकी भागीदारीसह मोडला १७ वर्षांचा विक्रम

IND vs WI : डोमिनिका मैदानावर सुरू असलेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला कसोटी सामना पाहुण्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. प्रथम फलंदाजी करत यजमान वेस्ट इंडिजने ६४.३ षटकात केवळ १५० धावाच केल्या. मात्र प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा वर्षाव झाला. युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने कर्णधार रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) शानदार भागीदारी रचली आहे. या द्विशतकी भागीदारीसह रोहित-यशस्वी जोडीने विक्रमांची रास घातली आहे.

या सामन्यात टीम इंडिया नवोदित यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या नव्या सलामीच्या जोडीसह मैदानात उतरली. या जोडीने इतिहास रचला आणि वेस्ट इंडिजमध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी सलामीची भागीदारी केली. यापूर्वी २००६ मध्ये वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवागच्या जोडीने सेंट लुसियामध्ये १५९ धावांची भागीदारी केली होती, मात्र आता १७ वर्षांनंतर रोहित आणि यशस्वीच्या जोडीने हा आकडा मागे टाकला आहे. रोहित आणि यशस्वीमध्ये पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी झाली आहे.