टीम इंडियाला मोठा झटका, मालिका सुरू होण्यापूर्वीच स्टार खेळाडू जखमी

Mumbai – 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वेला रवाना होण्यापूर्वी जखमी झाला आहे. सुंदरची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सुंदरचे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळणे धोक्यात आले आहे.

वॉशिंग्टन सुंदर गेल्या दोन वर्षांपासून दुखापतींशी झुंज देत आहे. नुकतेच सुंदरने कौंटी क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. कौंटीमध्ये, सुंदर चेंडूने अप्रतिम कामगिरी करत होता आणि त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पाचहून अधिक बळी घेतले. इतकेच नाही तर कौंटी क्रिकेटदरम्यान त्याची बॅटही खेळली आणि त्याने शानदार अर्धशतक झळकावले.

मात्र आता सुंदरच्या दुखापतीची माहिती समोर आली आहे. रॉयल लंडन वन डे चषकात लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सुंदर सहभागी झाला होता. क्षेत्ररक्षण करताना सुंदरला दुखापत झाली. त्यावेळी सुंदरला खूप वेदना झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर काढावे लागले.

2020 च्या आयपीएलनंतर वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियाच्या प्लॅनचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गब्बाच्या ऐतिहासिक सामन्यातील विजयात सुंदरने बॅट आणि चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही सुंदरची कामगिरी चांगली होती.

मात्र त्यानंतरच सुंदरला दुखापतींना सामोरे जावे लागले. यंदाच्या आयपीएलमध्येही सुंदरला दुखापत झाली होती. इतकेच नाही तर यानंतर सुंदरला भारतासाठी कोणत्याही मालिकेचा भाग होता आलेला नाही. जर सुंदर दुखापतीतून लवकर बरा झाला नाही तर टीम इंडियात पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूप कठीण जाईल.