लोकसभा, विधानसभासह सर्व निवडणुकांत इंडिया आघाडीचाच उमेदवार निवडून येणार – महेश तपासे

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी राबवणार शरद संपर्क अभियान

Mahesh Tapase: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Loksabha Election 2023) कल्याण लोकसभा मतदारसंघात जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीला (India Alliance) मोठा प्रतिसाद सर्वसामान्य जनतेमधून दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचाच उमेदवार निवडून येईल यात कुठलेही दुमत नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Spokeperson Mahesh Tapase) यांनी व्यक्त केला आहे. आगामी ठाणे जिल्ह्यातील शरद संपर्क अभियानासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

40% कर लावून सरकारकडून शेतकऱ्यांचा कांदा सडवण्याचं काम…
तर देशातील आणि राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. 40% निर्यात कर लावून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कांदा सडवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनीही 40% निर्यात कर रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी स्पष्ट केले.

रोजगार निर्मिती आणि उद्योगधंदे आणण्यामध्ये सरकार अपयशी…
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. शिंदे फडणवीस सरकार रोजगार निर्मिती करण्यात आणि उद्योगधंदे राज्यात आणण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही ऐकण्यात येत नसल्याने युवा शेतकऱ्यांवर मंत्रालयात येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघातही तपासे यांनी यावेळी केला.

जनतेला मंत्रालयात येऊन आंदोलन करावे लागणे खेदजनक…
सर्वसामान्य लोकांचे आवाज आणि प्रश्न कोणीही सोडवत नसल्याने सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात येऊन आंदोलन करावे लागते ही बाब खेदजनक आहे. शिंदे सरकार लोकाभिमुख नसल्यामुळे जनतेचे प्रश्न, लोकांच्या अडचणी या मंत्र्यांना माहित नाहीत. मंत्रालयात सर्वसामान्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा मंत्र्यांसमोर मोठ्या प्रमाणात गराडा असतो असा टोलाही यावेळी महेश तपासे यांनी राज्य सरकारला लगावला.

तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद जाणार…
शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर नोव्हेंबरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. आमचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांनी शेड्युल्ड 10 नुसार कारवाई केल्यास हिवाळी अधिवेशना अगोदर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकते असेही यावेळी महेश तपासे यांनी सांगितले.

30 सप्टेंबरपासून ठाणे जिल्ह्यात शरद संपर्क अभियान…
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात 30 सप्टेंबरपासून शरद संपर्क अभियानाला सुरूवात होणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेपर्यंत शरद पवारांचे विचार पोहोचवण्याचं काम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

तर गेल्या काही दिवसात ज्याप्रमाणे काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली, त्याला कल्याण भिवंडी मतदार संघातील पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता आणि स्थानिक जनतेकडून विरोध होत आहे. या परिसरातील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनता राष्ट्रीय शरद पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. शरद संपर्क अभियानामार्फत शरद पवार यांनी 50 वर्षात केलेल्या कामाची माहिती, विचार पोहचवण्यासह कठीण काळात पक्षासोबत उभे राहिलेल्या सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेचे आभारही मानले जाणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले. मुरबाडमधील माळ आणि वैशाखरे गटातून सुरू होणाऱ्या या अभियानाची जबाबदारी अध्यक्ष दिपक वाघचौडे आणि नामदेव गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुरबाडपाठोपाठ भिवंडी, कल्याण शहर, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये होणार असल्याचे तपासे म्हणाले.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश