भारताचा बलाढ्य न्यूझीलंडवर सोपा विजय, २१व्या षटकातच सामना जिंकत मालिकाही घातली खिशात

रोहित शर्मा आणि संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात सोपा विजय मिळवला. ८ विकेट्स राखून हा सामना जिंकत भारतीय संघाने पुन्हा एकदा मायभूमीवरील त्यांचे निर्विवाद वर्चस्व राखले. या सामना विजयासह भारतीय संघाने २-० ने ३ सामन्यांची वनडे मालिकाही खिशात घातली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ १०८ धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २०.१ षटकात ८ विकेट्स बाकी ठेवत सामना जिंकला.

न्यूझीलंडच्या सोप्या १०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहितने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अर्धशतक (५१ धावा) झळकावत संघाला विजयाच्या नजीक नेले. तसेच मागील सामन्यातील द्विशतकवीर शुबमन गिलने नाबाद ४० धावांची उपयुक्त खेळी केली. अशाप्रकारे २१व्या षटकातच २ विकेट्स गमावत भारतीय संघाने १११ धावा फलकावर लावल्या आणि न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला.

तत्पूर्वी शमीने (Mohammad Shami) पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलनला त्रिफळाचीत करत विकेट्सचा श्रीगणेशा केला. त्याने फिन ऍलनला शून्य धावेवर बाद केले. पुढे त्याने डॅरिल मिचेल (०१ धाव) आणि मिचेल ब्रेसवेल (२२ धावा) यांच्याही महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) ६ षटकात १६ धावा देत २ विकेट्स काढल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही ३ षटकात ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शमी, वॉशिंग्टन आणि हार्दिकबरोबरच मोहम्मह सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. या डावात न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर न्यूझीलंडचे ७ फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाले.