भारतीय अश्व होताहेत क्रीडा मैदाने गाजवण्यासाठी सज्ज

पुणे : एकेकाळी युद्धभूमीत पराक्रम गाजविणारी भारतीय अश्वे गेल्या काही दशकांपासून केवळ सण-समारंभात मिरविण्यासाठी अथवा टांगागाडीच्या सफरीपुरता मर्यादित राहिले होते. मात्र भारतीय अश्वांची ही ओळख आता बदलत आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि चांगले प्रशिक्षण यांच्या जोरावर भारतीय अश्वे ही शर्यतींसोबतच विविध क्रीडा मैदानांवर(Play Ground) आपले शौर्य गाजविण्यासाठी सज्ज होत आहे.

इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे (आयएचओए) पुण्यातील रेसकोर्स येथे 31 मार्च आणि एक एप्रिल रोजी भारतीय प्रजातीतील मारवारी अश्वांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांसह देशभरातील जवळपास 150 मारवाडी अश्व सहभागी झाले होते.

टीथ फिली, टू टीथ कोल्ट, मेअर आणि स्टेलिन अशा सहा श्रेणीतील सहभागी घोड्यांपैकी प्रत्येक श्रेणीतील एका सर्वोत्कृष्ट घोड्याची निवड करत, त्याला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, असोसिएशनचे अध्यक्ष अजय नॅन्सी, उपाध्यक्ष हर्ष लुनिया, धीरज देशमुख,रणजीत पवार,धवलसिंग मोहिते पाटील हे उपस्थित होते.

यावेळी मारवाडी अश्वांबद्दल माहिती देताना असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्ष लुनिया म्हणाले,” ब्रिटिश राजवटीच्या काळात जेव्हा परदेशी घोडे आपल्याकडे आले, तेव्हा भारतीय घोड्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले. खरेतर डोंगरउतार, उष्ण- खडकाळ प्रदेश, गवताळ प्रदेश, पाणथळ अथवा थंड वातावरणाचे प्रदेश अशा कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत आणि  अगदी टोकाच्या तापमानातही अतिशय सहजपणे वावरणारे भारतीय अश्व दुर्लक्षामुळे पुरेसा विकास साधू शकले नाही. परिणामी विविध शर्यती, क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण न मिळल्याने ही अश्वे पुरेशी सक्षम नव्हती. मात्र आता हे चित्र बदलत आहे. देशभरातील अनेक नागरिकांमध्ये विशेषतः तरुण पिढीत भारतीय अश्वांबाबत कमालीची जागरूकता निर्माण झाली असून, एकेकाळी 50 हजार रुपये ही सुद्धा अधिक वाटणारी या प्रजातींची किंमत आज भारतीय बाजारात पाच ते सात कोटी रुपये इतकी वाढली आहे. त्याचबरोबर या अश्वांना हर्डल रेस, जपिंग, फ्लॅट रेसिंग, पोलो, टेंट मेकिंग, आऊट राईड, ड्रेसाज अशा विविध क्रीडा प्रकरांसाठी अश्वांना सज्ज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकासही देशभरातसुरू आहे. हेच आयएचओए’चे यश आहे असे आम्ही मानतो.”

भारतीय अर्थव्यवस्थेत मारवाडी घोड्यांच्या योगदानाबद्दल बोलताना हर्ष लुनिया म्हणाले,” भारतीय अश्वांचे महत्व जे केवळ सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुरतेच मर्यादित नाहीये. तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही मारवाडी अश्व आपले योगदान देत आहेत. या घोड्यांच्या पुनरुज्जीवनाच्या अनुषंगाने अनेक पूरक व्यवसायांना चालना मिळत आहे. यामध्ये चारा व्यवसाय, घोडयांसाठी आवश्यक असणारी सप्लिमेंट पुरविणारे व्यवसायिक, धातू उद्योजक, पशुवैद्यक, अशा अनेक जोड उद्योगांमध्ये या माध्यमातून रोजगार निर्माण होत आहे.”

मारवाडी घोड्यांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमासपुढे असणारी आव्हाने आणि पुढील दिशा याबाबतही हर्ष लुनिया यांनी माहिती दिली. ते म्हणाले,”पोलो घोड्यांसाठी आणि रेसिंग घोड्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे आहे. जागतिक अश्व संघटनेने भारतीय प्रजातील घोडे हे शर्यतींसाठी अपात्र ठरविले आहे. मात्र मारवाडी घोड्यांवरील हा शिक्का पुसण्याचा आम्ही आयएचओए गेली नऊ वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहोत. याच अनुषंगाने 2019 साली पुण्यातील रेसकोर्स येथे पहिल्यांदा भारतीय प्रजातीचा मारवाडी घोडा शर्यतीत उतरविला होता. पुढील काळातही जनजागृती, योग्य प्रशिक्षण यांच्या आधारावर मारवाडी घोड्यांच्या प्रतिभेला उजाळा देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू राहतील.”