‘आमच्या लेकरावर अन्याय झाला’, महाराष्ट्र केसरीतून बाहेर पडलेल्या सिकंदर शेखच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना

पुणे- महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य सामन्यात महेश गायकवाडने सिंकदर शेखचा (Sikandar Sheikh) पराभूत करत त्याचे मानाची गदा उचलण्याचे स्वप्न मोडीत काढले. सिंकदरच्या पराभवानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे. विजेत्यापेक्षाही जास्त चर्चा होत असलेल्या सिकंदर शेखला सोशल मीडियावर ‘हार कर जितनेवाले को सिकंदर कहते है’ अशी उपाधी देण्यात आली आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र सिकंदरसाठी सांत्वना व्यक्त करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र केसरी पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या सिकंदरच्या आई-वडिलांनी स्पर्धेबाबत खंत व्यक्त केली. आमच्या मुलावर अन्याय झाला आहे, पंचांचा निर्णय चुकला आहे, अशी माहिती सिकंदर शेखचे वडील रशीद पैलवान व त्यांची आई यांनी दिली.

“सिकंदरला हमाली करत आम्ही मोठं केलं. कबाड कष्ट करून त्याला पैलवान केलं सिकंदरने देखील रात्रंदिवस एक केलं,काही पॉईंटने त्याला उपांत्य फेरीत कमी पॉईंट दिलें गेले हे अतिशय निंदनीय आहे.आमच्या मुलावर जो अन्याय झाला, तो इतर पैलवानांवर अन्याय होऊ नये,” असे सिकंदरच्या आई वडिलांनी सांगितले.

पराभवानंतर सिकंदर शेखची प्रतिक्रिया
उपांत्य सामन्यातील पराभवानंतर सिकंदर शेख म्हणाला, मी काय सांगितलं हे सोशल मीडियावर पोहचलं आहे. मला काल रात्रीपासून खूप जणांचे कॉल येत आहेत. मोबाईल स्वीच ऑफ करून टाकला आहे. खूप कॉल आले आहे. इंस्टा, फेसबूक, व्हॉट्सअप या माध्यमातून मेसेज येत आहेत. कुस्तीत नेमकं काय झालं. हे सगळ्यांना दिसतं की कुस्तीत काय झालं.

मला सगळे जण विचारत आहेत. मला विचारण्यापेक्षा जी कमिटी आहे त्यांना विचारा हे कशामुळं आणि काय झालं. चार पॉईंट का दिले. मी कोल्हापूरला निघत होतो. पण, मला सांगितल्यामुळं मी येथे आलो. झालं गेलं ते विसरून जावे. पुढच्या पुढं आपण बघुया, असं सिकंदर शेख यानं सांगितलं.