ठाकरेंनी शिंदेंना ‘पालापोचाळा’ म्हटल्याने भाजपा संतापली, सुप्रिया सुळे यांनाच ओढलं वादात

Mumbai – दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. शिवसेना आमदारांचा एक गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

दरम्यान, आता या मुलाखतीवर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सुद्धा ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. मुख्यमंत्र्यांना घालून पाडून बोलणं, अपमानित करणं हे महाराष्ट्राला मान्य नाही. यावर सुप्रिया सुळे काही बोलणार आहेत का? हा महाराष्ट्रद्रोह होत नाही आहे का?, अशी विचारणा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपामुळे आहे. भाजपाला बोलणं, टोमणे मारणं असं केलं तरच यांना महाराष्ट्रात स्थान असेल अशी स्थिती आहे. ही वाईट खोड काही सहजासहजी जाणार नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.