माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीयेत …काय गौडबंगाल आहे कळत नाही – शेट्टी

कोल्हापूर: पी.एम. किसान योजनेचा (P.M. Kisan Yojana) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पीएम किसान योजनेतून आपले नाव वगळण्यात यावे अशी मागणी अनेकदा संबंधित यंत्रणांकडे केली आहे. मात्र तरी देखील राजू शेट्टी यांच्या खात्यात पी.एम. किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा झाला आहे. परंतु हप्ता जमा झाल्यानंतर शेट्टी यांनी आपल्या खात्यातील पी. एम. किसानचे पैसे (money) पुन्हा तहसीलदारांकडे जमा केले आहेत.

राजू शेट्टी यांची फेसबुक पोस्ट

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता 31 मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. याआधी मी स्वत: ६ हप्ते जमा झालेनंतर १२ हजार रूपयाचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून मला अपात्र करणेबाबत पत्र दिले होते.

तरीही आज अखेर ११ हप्ते नियमीत जमा झालेले आहेत. आज पुन्हा शिरोळ तहसिलदार सौ. अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करणेबाबत सुचविले. मी वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतक-यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुध्दा त्यांचे पैसे येत नाहीत , काय गौडबंगाल आहे कळत नाही.