… तर अनिल अंबानींना होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा, 420 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप

नवी दिल्ली – काळा पैसा कायद्यांतर्गत आयकर विभागाने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर करचुकवेगिरीप्रकरणी खटला चालवण्याची नोटीस बजावली आहे. दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटींहून अधिक अघोषित पैशांवर 420 कोटी रुपयांचा कर (Tax) चुकवल्याबद्दल आयकर विभागाने रिलायन्स समूहाच्या अध्यक्षावर खटला चालवण्याची मागणी केली आहे.

आयकर विभागाने (Income Tax Department) अंबानींवर जाणूनबुजून कर न भरल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात, विभागाने म्हटले आहे की उद्योगपतीने परदेशातील बँक खाती आणि आर्थिक हितसंबंधांचा तपशील कर अधिकाऱ्यांना दिला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भात अंबानींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अनिल अंबानी यांनी 2012-13 ते 2019-20 या आर्थिक वर्षात परदेशात अघोषित संपत्ती ठेवून कर चुकविल्याचा आरोप आहे.

विभागाने म्हटले आहे की, 63 वर्षीय अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) कर कायदा, 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत खटला चालवला जाईल. या प्रकरणात, दंडाव्यतिरिक्त, 10 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची तरतूद आहे.प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नोटीसनुसार, कर अधिकार्‍यांना कळले की अंबानी हे आर्थिक योगदानकर्ते तसेच बहामासस्थित डायमंड ट्रस्ट आणि दुसरी कंपनी, नॉर्दर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड (NATU) चे लाभार्थी मालक होते. ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये NATU ची स्थापना झाली. बहामा ट्रस्टच्या बाबतीत असे आढळून आले की ती ड्रीमवर्क्स होल्डिंग्स इंक नावाची कंपनी आहे. कंपनीचे स्विस बँकेत खाते आहे. 31 डिसेंबर 2007 पर्यंत खात्यात $32 दशलक्ष म्हणजे $32,095,600 इतकी रक्कम होती.

सुरुवातीला, ट्रस्टला $25 दशलक्ष वित्तपुरवठा मिळाला, ज्याचा स्रोत अंबानींचे ‘वैयक्तिक खाते’ होता. हा ट्रस्ट उघडण्यासाठी 2006 मध्ये अंबानींनी केवायसी डॉक्युमेंट म्हणून आपला पासपोर्ट दिला. ट्रस्टच्या लाभार्थ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.