जयंत पाटलांनी केला भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ बड्या नेत्याचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली : आघाडी सरकार लवकरच कोसळणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे म्हणालेत आहेत. तर दुसरीकडे माझे १७० फोडून दाखवण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. या सगळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘वेळ’ साधत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. दोन एप्रिलच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्या उपस्थितीत नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

शिवाजीराव नाईक हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, भाजपचे माजी आमदार आणि राज्यमंत्री आहेत. 2014 मध्ये नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्हा परिषद आणि शिराळा पंचायत समिती भाजपची सत्ता आणा शिवाजीरावांना मंत्रिपद देतो, असे आश्वासन दिले होते. परंतु 2019 मध्ये शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला.