अजितदादांचा पानशेत पूरग्रस्त १०३ सोसायट्यांना दिलासा

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पानशेत पूरग्रस्त सोसायटी विकास मंडळ यांच्याकडून गेल्या कित्येक दिवसांपासून पानशेत पूरग्रस्तांचे मालकी हक्काचे प्रस्ताव दाखल करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत असताना आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांना आपले मालकी हक्काचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा मुदतवाढ दिल्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

फडणवीस सरकारने या पानशेत पुरग्रस्त सोसायट्यांना आपली मालकी हक्काचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी 8 मार्च २०१९ रोजी आदेश जारी केला होता. परंतु अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल करणे, त्यात विधानसभा व लोकसभेच्या आचारसहिता त्यानंतर आलेले कोरोना महामारीचे संकट या सर्व अडचणीमध्ये सोसायट्या आपले प्रस्ताव दाखल करू शकल्या नव्हत्या.

दरम्यान, आता सोसायट्यांची ही मागणी लक्षात घेत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या गोष्टीची मागणी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय जारी केला असून ,यापुढील तीन वर्ष पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांना आपले प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत. पर्वती परिसरात राहणाऱ्या नागरिकांची अत्यंत जिव्हाळ्याची असणारी ही मागणी मान्य केल्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष .प्रशांत जगताप यांनी आभार मानले.