राजपक्षेचे आक्रमक अर्धशतक, धवनची कॅप्टन्सी खेळी; पंजाबचे कोलकातापुढे १९२ धावांचे आव्हान

मोहाली- पंजाब किंग्जच्या होम ग्राउंडवर शनिवारी (१ एप्रिल) आयपीएल २०२३चा दुसरा सामना (PBKS vs KKR) झाला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९१ धावांचा डोंगर उभा केला. परिणामी कोलकात्याला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले.

पहिल्या डावात पंजाबकडून भानुका राजपक्षेने धुव्वादार खेळी केली. केवळ ३२ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने झटपट अर्धशतक ठोकले. त्याच्या साथीला कर्णधार शिखर धवनने ४० धावांची आक्रमक खेळी केली. शिवाय अष्टपैलू सॅम करननेही २६ धावा जोडल्या. या डावात कोलकाताकडून टीम साउथीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच अनुभवी उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला पव्हेलियनला धाडले.