अमोल कोल्हे शब्दाला जागले! बारी जिंकली, धुरळा उडवला…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज पुण्याच्या निमगाव दावडीत बैलगाडा घाटात घोडीवर स्वार होऊन दिलेला शब्द पाळला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भर सभेत लोकांना सांगितले होते की, जर मी निवडणून आलो तर बैलगाडा शर्यतीत घोडी पळवणार. यावरून विरोधात असलेले शिवसेनेचे माजी आमदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांना त्यांच्या आव्हानांची वारंवार आठवण करून डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु कोल्हेंनी तो शब्द पाळून विरोधकांची बोलती बंद केली.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने आता जिल्ह्यात जिकडे तिकडे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील निमगाव दावडीत खासदार अमोल कोल्हे हे खास आकर्षण असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे यांनी घोडीवर स्वार होऊन सगळ्यांना अभिवादन केले आणि लोकांना दिलेला शब्दही त्यांनी पाळला आहे. त्यामुळे सध्या अमोल कोल्हेंच्या या गोष्टीची चर्चा सर्वदूर सुरू आहे.

शब्द पाळला नाही म्हणून त्यावेळी विरोधात असलेले नेते सतत या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार, असा विचार त्यांच्या मनात येत होता. दिलेले चँलेंज स्विकारून ते पुर्ण केले. घोडी धरेल की नाही, अशी ज्यांच्या मनात शंका होती. त्यांना आता उत्तर मिळालं आहे, अस म्हणत त्यांनी आढळराव पाटील यांचा चिमटा काढला आहे. तसेच पुर्ण घाट घोडीवर स्वार होऊन आलो आहे, असंही त्यांनी सांगितले.

राज्यात काही प्राणी मित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. बैलगाडा शर्यतीत त्यांना होणारी अमानुष मारहाण, शॉक देण्याचे प्रकार आणि बैलांच्या शेपट्या चावणे यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु इतर राज्यात होणाऱ्या जल्लिकट्टू सारख्या स्पर्धावरून राज्यातील काही लोकांनी या विरोधात आवाज उठवला होता. अखेर न्यायालयाने महाराष्ट्रातील ही बंदी उठवली आणि बैलगाडा शौकिंनीनी एकदमच जल्लोष केला.