राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रभावाची चिंता भाजपला लागलीय ?

मुंबई   – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेबांच्या प्रभावाची चिंता भाजपला लागलीय असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी शरद पवारांचा २०२४ ची लोकसभा निवडणूक येता – येता राजकीय प्रभाव कमी होईल असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात ईडी सरकार स्थापन झाले असतानाही केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी पवारसाहेबांवर टिका केली आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, पवारसाहेबांचा करिश्मा किती आहे याची धास्ती भाजपने घेतली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यात सत्ता परिवर्तन ज्यापध्दतीने झाले ते राज्यातील जनतेला मान्य नाही आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला पराभव होणार हे लक्षात आल्यामुळे पवारसाहेबांच्या प्रभावाची चिंता भाजपला पडलीय असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.