वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा ‘टेरिटरी’; चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

‘Territory’ movie trailer  :  विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Directed by Sachin Shriram, the film has a strong star cast of Sandeep Kulkarni, Kishore Kadam and is slated to release on September 1.) नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला.

निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे ‘टेरिटरी’ हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहायक म्हणून काम केल्यानंतर आता ते टेरिटरी या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आहे, पारितोषिकप्राप्त ठरला आहे. कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन, मयूर हरदास यांनी संकलन, महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन, यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो, या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि एक थरारक शोध सुरू होतो. चित्रपटाच्या टीजरनं आधीच उत्कंठा वाढवली आहे. त्यात आता ट्रेलर लाँच करण्यात आला असून, चित्रपट कथानकासह सर्वच तांत्रिक बाजूंवर सक्षम असल्याचं दिसतं. विशेषतः सचिन श्रीराम यांचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं जाणवतंही नाही इतकं सफाईदार काम झाल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट दिसतं. छायांकन, वेगवान संकलन आणि पार्श्वसंगीतामुळे हा ट्रेलर विलक्षण परिणामकारक झाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीचे कुतूहल आता अधिकच वाढले आहे.