‘…तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते’

सातारा – स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या अफझल खानाच्या कबरीच्या आवारात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे अनधिकृत बांधकाम पाडलं जावं, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार अखेर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

चोख पोलीस बंदोबस्तात अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने हे बांधकाम पाडलं जातंय. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून ही कारवाई केली जातेय. शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.  10 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवप्रेमींकडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशानाकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari on Afzal Khan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर करण्यात येणाऱ्या कारवाईचं त्यांनी स्वागत केलं.महत्त्वाचं म्हणजे काही जणांनी ही कबर उद्ध्वस्त करावी, अशी मागणी देखील केली होती. मात्र ही मागणी रास्त नसल्याचं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

ते म्हणाले, अफझल खान हा स्वराज्याचा शत्रू होता. अफझल खानाचा वध हा इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. अफझल खानाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी काही लोकांनी केली होती. पण कबर उद्ध्वस्त केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे आपण ते न करता प्रतापगडावर येणाऱ्या लोकांना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास दिसावा.असं त्यांनी म्हटलं आहे.