पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे – बावनकुळे

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला-बुलडाणा- वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपची सरशी झाल्याचे दिसून येत आहे. सहापैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.

धुळे आणि मुंबईतील एक जागा बिनविरोध जिंकणाऱ्या भाजपने आज नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा या मतदारसंघात देखील आपला विजय साकारला. ;राज्य विधानपरिषदेच्या नागपूर मतदारसंघामध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे 362 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात रिंगणात असलेल्या महाविकास आघाडी पुरस्कृत मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. मतमोजणीमध्ये एकंदर 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवाराला किमान 275 मते मिळवणे अनिवार्य होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने ऐनवेळी उमेदवार बदलून छोटू भोयर यांचा अपमान केला. त्यामुळेच काँग्रेसचे अनेक मतदार नाराज झाले होते. या मतदारांनी आपली नाराजी ही मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे यापुढेही जोमाने काम करणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

दुसरीकडे विधानपरिषदेच्या अकोला-वाशीम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतमोजणीही पूर्ण झाली असून इथंही भाजपाचे वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत. त्यांनी गेल्या तीन वेळा आमदार असलेल्या शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा 109 मतांनी पराभव केला. खंडेलवाल यांना 443 तर बाजोरिया यांना 334 मते मिळाली.