मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा आज जास्त आनंद झाला – फडणवीस

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

दरम्यान, या विजयानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ‘आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा मोठा आनंद झाला आहे. महाविकास आघाडीला ही जोरदार चपराक’, असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

तर, अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र आल्यावर सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, हे मांडलेले गणित चुकीचं आहे, हे या निकालामुळं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांचा विजय ही भविष्यातील यशाची नांदी आहे. नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांचं आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा निर्णायक विजय असून भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे देखील पहा