मुंबईत महिला खेळाडूंना शौचालय नाहीत ही दुर्दैवी बाब; अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली नाराजी 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सर्वाधिक कर संकलन आणि बजेट प्रणाली आहे. तरीही इतक्या मोठ्या शहरात शौचालयाची सोय नसल्याने महिलां आणि वृध्दांना परिणाम भोगावे लागतात ही दुर्दैवाची बाब आहे अश्या शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. केंद्रीय मंत्री  अनुराग ठाकूर हे सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, महानगरपालिकेने खेळाकडे आणि खेळाडूंकडे आणि प्रामुख्याने महिला खेळाडूंकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आम्ही शहराचे सौंदर्यीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई शहराच्या विकासाकरिता आणि नवी धोरणे सुरू करण्यासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. भारतात चित्ता आणण्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना मंत्री  अनुराग ठाकूर म्हणाले, काँग्रेस कोणत्याही विषयाला कुठेही जोडत आहे. भारत आज स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे. भारताबाहेर निर्यातही वाढली आहे. देशात रोजगारही वाढत आहे. त्यामुळे या टीकेला काहीही अर्थ उरत नाही. मुंबई महानगरपालिकेने छोट्या व्यावसायिकांकडेही दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात केंद्राच्या योजनेतून लघु उद्योजकांसाठी ठोस काम केले जाईल अशी ग्वाही मंत्री  अनुराग ठाकूर यांनी दिली.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या भेटीबाबत अनुराग ठाकूर म्हणाले, यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. आम्ही आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवणार आहोत. भाजपाच्या (BJP) वतीने सर्व मतदारसंघात सुरू असलेल्या या दौऱ्याचा शिवसेना – भाजपा युतीला फायदाच होईल असही ते म्हणाले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिळ सेलवन, आमदार प्रसाद लाड, राजेश शिरवाडकर, श्वेता परुळकर, सतीश निकम, राजेश सिंग, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.