Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला घोटाळेबाज सुकेशशी लग्न करायचे होते, सलमान-अक्षयने तिला वाचवले

Mumbai – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चर्चेचा विषय आहे. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या(Sukesh Chandrasekhar)  संबंधांमुळे जॅकलीन चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईओडब्ल्यूने यापूर्वी अनेक मोठे खुलासे केले होते.

त्याचवेळी, जॅकलीन सुकेश चंद्रशेखरसोबत लग्नाचा प्लॅन करत असल्याच्या बातम्या येत आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जॅकलिनने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानला सांगितले की तिला सुकेशसोबत लग्न करायचे आहे. मात्र, दोन्ही कलाकारांनी सुकेशविरुद्ध जॅकलिनला सावध केले.

अहवालानुसार, तपासासाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये सामील असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा खुलासा केला आहे.  जॅकलिनला तिच्या सहकलाकारांनी सुकेशशी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता, परंतु अभिनेत्री सुकेशला भेटत राहिली आणि अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.

इतकेच नाही तर अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, जॅकलिन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी भूतकाळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि सुकेशसोबत आर्थिक व्यवहार करण्याचा निर्णय घेतला. केवळ जॅकलिनच नाही तर तिच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनाही या नात्याचा आर्थिक फायदा झाल्याचा दावा ईडीने केला आहे.