कसबा : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मात्र आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच 

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी दरम्यानच्या काळात पोलिसांना हाताशी धरून भाजपने (BJP) पैसे वाटल्याचा आरोप काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. त्याचबरोबर निवडणुक आयोगाचा नियम पायदळी तुडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) रात्री प्रचार करत होते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी आज पुण्यात धरणे आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.

मागील सात ते आठ दिवसांपासून भाजपकडून पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. याचे व्हिडीओ काढून आम्ही पोलिसांना दिलेत.  रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत शंभर फोन पोलिसांना दिलेत. आम्ही स्वत: त्याठिकाणी हजर होतो. असं असतांनाही पोलिस यंत्रणा काहीही कारवाई करीत नाही. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, निवडणुक अधिकारी राधिका बारटक्के यांच्याकडे गेल्या सात दिवसापासून अनेक तक्रारी दाखल केल्यात. परंतु त्या तक्रारीची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नसल्याचं काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदारांनी नियमाचा जो भंग केला आहे. त्यांच्यावर ताबोडतोब कारवाई झाली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आज पुण्यात पैसाचा पाऊस पडत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना बोलवून पोलिस दमदाटी करीत आहेत. या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडवी, आणि लोकशाही टिकावी यासाठी धरणे आंदोलन करीत असल्याचं काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे. पैसे वाटल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये सर्व काही दिसत आहे आणि हे सर्व पोलिसांना हाताशी धरून केलं जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, भाजपवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे अन् बिनबुडाचे आहेत. समार पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं काम सुरू आहे. अशा पद्धीतीचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु कसब्यातील नागरिक सुज्ञ आहेत. ते अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी पदयात्रा झाली आहे. यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे तुम्ही पुरावे द्या, हे आरोप सिद्ध करा. असं आवाहन पुणे शहाराध्यक्ष जगदिश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिलं आहे.