गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल – जितेंद्र आव्हाड

ठाणे – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात आला आहे. याठिकाणी धर्मसंसदेच्या (Dharm Sansad 2021) शेवटच्या दिवशी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं. यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत हीन दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालिचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे.कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले.

मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाडही पोलिसात गेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरूनच लढावे लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे. असे ट्विटही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.