बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटक परिवहन गाड्यांना काळे फासले

पुणे :  मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला आहे. अशातच आता कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.

या प्रकराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबरप्लेटवर काळं फासण्यात आलं आहे. हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या आहेत. तसेच कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असं लिहून रंगरंगोटीही करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविराेधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.