माझा जावई गुजराती आहे, माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला आरक्षण दिलं – सुशीलकुमार शिंदे 

सोलापूर  – माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे (son in law) मी गुजराती समाजाला आरक्षण दिल्याचं माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे(Former Chief Minister Sushil Kumar Shinde)  यांनी म्हटलं आहे. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.

दरम्यान,  सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. हे एक चांगलं काम मी केलं. त्यामुळेच मी पुन्हा निवडून येऊ शकलो.  मात्र लोकांना आता मी केलेल्या या कामाचा विसर पडल्याचेही शिंदे यांनी म्हटलं आहे.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले की, मला कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढण्यात आले. त्यानंतर मला राज्यपाल करून आंध्र प्रदेशमध्ये पाठवण्यात आले. राज्यपाल पदावरून मी पुन्हा दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून गेलो. मात्र, कटकारस्थान करणाऱ्या नेत्यांना ‘जो’ पराभव स्वीकारावा लागला तो अजूनपर्यंत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे असे मला वाटते  असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.