द्विशतक झळकावणाऱ्या ‘या’ वेगवान गोलंदाजाला नंतर संघात कधीही प्रवेश मिळालाच नाही

नवी दिल्ली – दहा वर्षे ऑस्ट्रेलियाचे ( Australia ) प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज जेसन गिलेस्पी ( Jason Gillespie )त्याच्या धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. या गोलंदाजाने फलंदाजीतही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिलेस्पीने आपल्या शेवटच्या डावात चितगावमध्ये बांगलादेशविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या . नाईटवॉटमॅन फलंदाज म्हणून हा विक्रम आजही कायम आहे. मात्र, ही खेळी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा मुक्काम ठरली. या सामन्यानंतर गिलेस्पीला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले नाही.

२००६ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चितगाव येथे खेळवला जात होता. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव 197 धावांत आटोपला. यानंतर फिल जॅक आणि मॅथ्यू हेडन या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. मॅथ्यू हेडन 29 धावा करून बाद झाला तेव्हा जेसन गिलेस्पीला तिसऱ्या क्रमांकावर नाईटवॉचमन म्हणून पाठवण्यात आले. त्यानंतर जे घडले त्याची नोंद इतिहासात आहे.

कर्णधार रिकी पाँटिंग आणि गिलेस्पी यांच्यात 90 धावांची भागीदारी केली होती. पाँटिंग 52 धावा करून धावबाद झाला. यानंतर गिलेस्पीने माईक हसीच्या साथीने 320 धावांची शानदार भागीदारी केली. गिलेस्पीने 426 चेंडूत 26 चौकार आणि दोन षटकारांसह 201 धावांची खेळी खेळली. या सामन्यात माईक हसीने 182 धावा केल्या. गिलेस्पीचे द्विशतक पूर्ण होताच पाँटिंगने डाव घोषित केला.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 384 धावांची आघाडी मिळाली. बांगलादेशचा दुसरा डाव 304 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने 80 धावांनी सामना जिंकला. गिलेस्पीला या सामन्यातील सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तो मालिकावीरही ठरला. मात्र त्यानंतर तो कधीही ऑस्ट्रेलियाकडून खेळू शकला नाही.जेसन गिलेस्पी हा बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सचा प्रशिक्षक होता. याशिवाय तो इंग्लिश कौंटी संघ यॉर्कशायरचा ५ वर्षे प्रशिक्षक होता. त्याने भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही ( Ishant Sharma ) कठीण काळात मदत केली आहे. इशांतने आपल्या खेळातील बदलाचे श्रेय गिलेस्पीला दिले आहे. गिलेस्पीने ऑस्ट्रेलियासाठी ७१ कसोटी, ९३ वनडे आणि एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे. दुखापतीमुळे प्रभावित झालेल्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने कसोटी सामन्यात 259, एकदिवसीय सामन्यात 142 आणि टी-20 मध्ये 1 बळी घेतला.