गांधीजींच्या विचारांचा विरोध करणारी मंडळी ही भाजपाच्या जवळ असतात हा योगायोग नाही – सावंत

मुंबई – एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ'(ST Kashtakari Jansangh)  या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत काल अधिकृत घोषणा केली. सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यावेळी गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असे ते म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा (Nathuram Godse)  नथुरामजी असा उल्लेख केला आहे. त्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुणरत्न सदावर्तें म्हणाले की, गांधीवादाने देशाची महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असे गंभीर वक्तव्य करुन सदावर्तेंनी नथुरामजी असा महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा(Nathuram Godse)  उल्लेख केला आहे.

दरम्यान, आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, सदावर्ते या महाभागाची भाजपा व संघपरिवारातील जवळीक असून भाजपाच्या अजेंड्यावर चालताना सर्वांनी पाहिले आहे. आता महात्मा गांधींच्या विचारांना कमी लेखून गोडसेचे उदात्तीकरण करण्यासाठी ‘नथुरामजी’ म्हणत आहे. भाजपाचा सदावर्तेंच्या या विचारांना ही पाठिंबा आहे का? हे स्पष्ट झाले पाहिजे.

न्यायालयात गांधीजींची प्रतिमा असते हे वकीली करणाऱ्या सदावर्तेंच्या लक्षात नसेल तर बार कौन्सिलने(Bar Council) या विधानाची दखल घेऊन पुढील कारवाई करावी. गांधीजींच्या विचारांचा विरोध करणारी मंडळी ही भाजपाच्या जवळ असतात हा योगायोग नाही.असं देखील सावंत यांनी म्हटले