आपके बुरे दिन जल्द आएंगे! संतापलेल्या जया बच्चन यांनी दिला सत्ताधाऱ्यांना शाप

नवी दिल्ली- एकीकडे पनामा पेपर्सप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या रायची चौकशी सुरु असताना तिकडे राज्यसभेत समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन सत्ताधारी भाजपवर चांगल्याच संतापल्या. 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी जया बच्चन उभ्या राहिल्या, मात्र यादरम्यान काही खासदारांनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली. यानंतर परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की जया बच्चन यांनी थेट सरकारला शापच देऊन टाकला!

जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलं.त्या म्हणाल्या, माझ्यावर वैयक्तीक टिपण्णी केली. माझा तुम्हाला शाप आहे, तुमचे लवकरच वाईट दिवस येणार आहेत. तुम्ही आमचा जीवच घ्या. तुम्ही काय करताय? कुणापुढे पुंगी वाजवत आहात?, असं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेतील आपल्या युक्तीवादादरम्यान केलं आहे.

दरम्यान, जया बच्चन यांच्या युक्तीवादानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.  अध्यक्षस्थानी असलेल्या भुवनेश्वर कलिता यांनी काही वेळासाठी राज्यसभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.