Jayant Patil | आमचे छत्रपती चार दिवस दिल्लीत होते पण भेट दिली जात नव्हती, जयंत पाटलांचे भाजपावर टीकास्त्र

Jayant Patil |  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके आपला प्रचार करणार आहेत. या यात्रेचाही आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

यावेळी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, लोकांनी उमेदवाराला खांद्यावर घेतले आणि निवडणूक लोकांनी हातात घेतली तर कोणतीही शक्ती त्या उमेदवाराचा पराभव करू शकत नाही. निलेश लंके हे स्थानिक आहेत, लोकप्रिय आहेत, सतत फिरतीवर असतात. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केले आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. या लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळे हा उमेदवार आपण पुढे केला आहे. लंके इथल्या लोकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारणे योग्य नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली तसेच कोणत्या विचारामागे राहून आपण काम करतोय हे पाहणे गरजेचे आहे. राजकारणात विचार आणि आचार फार महत्वाचे असतात. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या मागे लोक मोठय़ा ताकदीने उभे आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचीही परिस्थिती बदलू शकतात यावर लोकांचा ठाम विश्वास आहे असेही ते म्हणाले.

अहमदनगर जिल्हा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जिल्हा आहे. त्यांना दुर्दैवाने फार तरुण वयात आपल्या पती गमवावे लागले पण त्यांनी न डगमगता आपले राज्य सांभाळले. आपल्या राज्याचे रक्षण त्यांनी केले. हा आपला इतिहास आहे. निलेश लंके या विचारांचे पाईक आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचे नाही हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा बाणा आहे असेही ते म्हणाले.

आमच्यातले काही सरदार तिकडे गेले आहे पण दिल्ली दरबारी त्यांना काही मान नाही. दिल्ली त्यांना बाहेर तात्काळात ठेवते. काल आमचे साताऱ्याचे छत्रपती चार दिवस दिल्लीत होते पण त्यांना भेटीसाठी वेळ दिला गेला नाही. अरे दिल्ली दरबारात दुसर्‍या रांगेत उभे केले म्हणून शिवराय बादशाहाचा भरलेला दरबार सोडून निघून आले. शिवरायाने आणि शंभूराजाने आपल्याला स्वाभिमानाचे बाळकडू पाजले आहे. हा स्वाभिमान आपण सर्वांनी जपला पाहिजे असे सांगत असतानाच निलेश लंके या लढाईच्या रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूने सर्व गोष्टींचा पाऊस पाडला जाईल पण लोकांनी लंके यांच्या बाजूनेच मतांचा पाऊस पाडावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका