भाजपचे राजकारण देश घडविण्यासाठी; राजनाथ सिंग यांनी साधला भाजप पदाधिकार्यांशी संवाद

पुणे : आपण जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे  कार्यकर्ते आहोत हे विसरू नका, त्यामुळे  समाजासाठी आपली जबाबदारी मोठी आहे, याची जाणीव ठेवा. प्रारंभापासून आपली विचारसरणी केवळ सत्ता मिळविण्यासाठी नाही तर देश घडविण्यासाठी भाजप राजकारण करते असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sinh) यांनी व्यक्त केले.

पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात सिंह मार्गदर्शन करीत होते. खासदार गिरीश बापट (Girish Bapat), शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, हेमंत रासने, गणेश बीडकर, बापू पठारे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येणपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना आणि रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाचा परिणाम भारतासह जगातील सर्व देशावर झाला आहे. जगातील सर्वात  श्रीमंत देश असलेल्या अमेरिकेत गेल्या ४० वर्षात जेवढी महागाई नव्हती तेवढी महागाई वाढली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आव्हानाचा संयमाने सामना करावा अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी केली.

राजनाथ सिंह म्हणाले,  मोदीजी (Modiji) पंतप्रधान झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे भारताची जगात सर्वात ताकदवान देश आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी ओळख निर्माण झाली आहे.काँग्रेस सरकारच्या काळात या गतीने देशाचा विकास होत नव्हता. ७० वर्षानंतरही नागरिकांच्या मुलभूत समस्या कायम होत्या.२०२२ वर्ष संपेपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास घर असेल हा संकल्प पूर्ण होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाने पाणी आणि शौचालय बांधले. जनधन योजनेतून ४५ कोटी बँक खाते उघडण्यात आल्याने (45crore bank accounts were opened through Jandhan Yojana) शासकीय योजनेतील भ्रष्टाचार बंद झाला.

रशियाकडून युक्रेनवर बाॅम्बफेक सुरू होती. त्यावेळी युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी अडथळे येत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सांगून बाॅम्बफेक बंद करायला लावली. मोदी यांचे पुतीन यांनी ऐकले. ८ वर्षात अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रतिष्ठा वाढली आहे. पूर्वी आपल् म्हणने कोणी ऐकत नव्हते, आता संपूर्ण जग गांभीर्याने ऐकत आहेत, असे ही राजनाथ सिंग यांनी सांगितले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांची भाषणे झाली.