केजरीवाल यांना माफी मागावीच लागेल; तेजस्वी सुर्यांचा आक्रमक बाणा कायम 

नवी दिल्ली- काश्मिरी पंडितांच्या खिल्ली उडवल्याचा आरोप असणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर (Arvind Kejriwal House) आज जोरदार राडा पाहायला मिळाला. काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri pandit) मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी  चांगलाच धुडगूस घातल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर (आयपी कॉलेजजवळील लिंक रोड) धरणे आंदोलन सुरू केले. त्यात दीडशे ते दोनशे लोक होते. द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या वक्तव्यावरून हे आंदोलन करण्यात आले. यानंतर एकच्या सुमारास काही आंदोलक दोन बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि तेथे त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यानंतर या लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि बूम बॅरिअरही तोडले.

या आंदोलनावेळी भाजप नेते खासदार तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या (mp tejaswi surya) ,तेजिंदर पाल सिंग बग्गा आणि काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, या सर्व प्रकारावर आता तेजस्वी सूर्या यांनी ट्वीटकरून भाष्य केले आहे. ते म्हणाले,  काश्मिरी पंडितांच्या हत्याकांड, बलात्कार आणि नरसंहारावर झालेला अमानवी हास्य हा केजरीवालांच्या घृणास्पद राजकारणाचा आणखी एक स्तर आहे. हिंदूंवरील अत्याचार खोटे आहेत, त्यांच्यासाठी काश्मिरी पंडितांची दुर्दशा हा चेष्टेचा विषय आहे, हे केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. केजरीवाल यांना माफी मागावी लागेल.असं ते म्हणाले आहेत.