भाजपवर टीका करण्याच्या नादात नानाजींनी चक्क सोनिया गांधींनाच खोटे पाडले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेबाबत पंजाबमध्ये (Punjab) घडलेल्या प्रकारावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही निवळताना दिसत नाहीय. यावरुन सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित करून पंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केल्याचे स्पष्ट दिसत असून नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, पटोले यांनी केलेल्या टीकेला आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना नानाजींनी आपली पात्रता तपासून घ्यावी, असे आम्ही सुचवणार नाही. घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार नानाजींना आपले मत व्यक्त करण्याचे पुरेपूर स्वातंत्र्य आहे. मात्र विचार करून बोलणे आणि बरळणे यातील फरक नानाजींना लक्षात आलेला नाही. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई बद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त नानाजींच्या वाचण्यात आले नसावे. हे वृत्त वाचले असल्यास त्याचा अर्थ नानाजींच्या लक्षात आला नसावा.

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाल्याचे खुद्द सोनिया गांधी मान्य करत आहेत. नानाजी मात्र सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाली नसल्याचेच वारंवार सांगत आहेत. राहुल गांधींच्या हुजरेगिरीसाठी आपण आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना खोटे पाडले आहे, हे नानाजींच्या केंव्हा लक्षात येणार हे परमेश्वरालाच ठाऊक, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.